गेल्या शनिवारी माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची वांद्र्याच्या खेरनगर परिसरात रात्री हत्या करण्यात आली. दुर्दैवी हत्येला सात दिवस पूर्ण होत आहेत. पोलिसांनी काही संशयितांना पकडले असले तरी पोलिसी सूत्रांनुसार जे चित्र जनतेपुढे आले आहे ते मात्र पूर्ण निराशाजनक आहे असं म्हणायला बरीच जागा आहे. बाबा सिद्दीकी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे माजी आमदार होते. तसेच ते तब्बल १५ वर्षे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. बाबा सिद्दीकी माजी आमदार व त्यातही सत्तारूढ राजकीय पक्षाचे आमदार असल्याने पोलिसांनी ही त्वरीत हालचाल व तपास करून काही संशयितांना पकडण्यात यश मिळवले आहे यात वाद नाही. बाबा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचे निकटवर्तीय असल्याने जो सलमानचा शत्रू तोच बाबाचा शत्रू हा न्याय लावून या हत्येमागे कुविख्यात लॉरेन्स बिष्णोई असल्याचे दुसऱ्याच दिवशी जाहीर केले. दुसऱ्याच दिवसापासून सर्वच माध्यमानी बिष्णोई हा राजस्थान मधून कसा आला आणि जागतिक माफिया कसा बनला याच्या अद्भुतरम्य कथा जनतेला सांगण्यास सुरुवात केली. इतक्यानेच भागले नाही म्हणून काहीनी दिल्ली वर्तुळातील कुजबुजीचा आधार घेत बिष्णोई देशाच्या ' रॉ ' संघटनेसाठी काम करत असल्याचा बेमिसाल शोध ही लावला.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा शोध घेण्यासाठी सरकार बिष्णोईचे सहकार्य घेत ही असेल, त्यात गैर काही नाही पण याचा अर्थ लगेच गृहमंत्रालय त्याच्याशी नरमाईने वागत असल्याचा निष्कर्ष काढणे आततायी पणाचे ठरेलं. बाबा सिद्दीकी हे काही शेकडो कोटींचे मालक असले तरी जागतिक स्तरावर गुन्हेगारी करणारा अट्टल गुन्हेगार गल्लीत चिंधीचोरी करणार नाही असे गुन्हेगारी जगताचा कानोसा घेतला असता समजले. गुन्हेगारांचा शेवटी पैशाशीच संबंध असतो मग तो कुठून ही मिळे ना का!!
" Society prepares the crime ; the criminal commits it " या वचनानुसार बाबा सिद्दीकी यांनी ही समाजात असलेल्या गुन्हेगारीचा आपल्या वैयक्तिक व राजकीय फायद्यासाठी खुबीने उपयोग करून कोट्यावधीच्या संपत्तीवर आरुढं झाले होते असे समजते. उपमुख्यमंत्री व गृहमंत्रीपद सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलताना बाबा यांचे सुपुत्र झियान सिद्दीकी यांनीही झोपडट्टी पुनर्वसन प्रकल्पनाचा उल्लेख केला आहे ते उल्लेखनीय आहे कारण आम्ही तर पहिल्या दिवसापासून ही हत्या एसआरए प्रकल्पाच्या वादातूनच झाल्याचे सांगत आहोत. याचा पुनर्वसनाच्या वादात खुद्द झियान यांच्या वरही आरोप करण्यात आलेले आहेत.
निर्मल नगरच्या वाढत्या झोपड्यात खरे कारण सरकारी वसाहतीच्या जवळ असलेल्या वांद्रे (पु ) येथील खेरवाडी व निर्मल नगर हे कित्येक वर्षांपासून बरेचसे झोपडपट्टी व अनधिकृत चाळीचे माहेरघर आहे. पूर्वी या परिसरात ऐडवीन व अंजुम या दोन भाईंची दादागिरी चालत असे. याच भागात कुख्यात काळ्या अँथनी व काल्या बाबू यांनी आपली दहशत वाढवली होती.
(यातील काल्या बाबू, एका माजी खासदाराचा बॉडीगार्ड होता असे समजले) काळ्या अँथनीला यमसदनी पाठवल्यानंतर अंजुम याच्या मदतीने बाबा यांनी शेकडो झोपड्या व चाळी अधिकृत करून घेतल्या यातून रग्गड पैसा केला.
बाबा सिद्दीकी यांनी त्यांचा मतदार संघ असलेल्या बांद्रा पश्चिम येथे तर बाबा यांनी रियल इस्टेट क्षेत्रातील आपले साम्राज्य साम दंड भेद या नितिनेच उभारले असल्याचे अनेकांनी सांगितले अनेक ख्रिश्चनांन बांधवांची छोटी मोठी घरे बळाकवून वा त्यांना धमकावून ताब्यात घेतली व तेथे गगनचुंबी इमारती बांधल्या असा आरोप सर्रास केला जात आहे. एक मटण निर्यातदार मात्र त्याला पुरून उरला होता असे त्या मतदार संघात सांगतात ख्रिस्ती बांधव या संबंधात तक्रार करत नाहीत कारण त्यांचे सर्व भूखंड हे सरकारी लिजवर आहेत. खान फार्म चा परिसर पोलिसांनी ताब्यात घ्यावा सलमान खानच्या पाली हिल येथील बंगल्यावरील शूट आऊट पासून त्याचे पनवेल येथील फार्म हाऊस जास्तच प्रकाशात येऊ लागले आहे. इतकेच काय बंगल्यावर गोळ्या झाडणारा काही काळ त्या फार्म हाऊसमध्ये काम ही करत होता. अखेर तो सापडला पनवेल मध्येच! काल ही जे संशयित पकडण्यात आले त्यातील एक जण ही पनवेल मधलाच आहे. इतर ही संशयित आजूबाजूच्या परिसरातच किंवा पाच दहा किलो मीटरच्या परिसरात राहणारेच आहेत नवी मुंबई आणि पनवेलच्या आजूबाजूचा परिसर पोलिसांनी व यंत्रणानी पिंजून काढला तर लपलेले अनेक गुन्हेगार पोलिसांना सहज सापडतील असे वाटते. या विस्तीर्ण प्रदेशात असलेली लहान मोठी गेस्ट हाऊसेस गुन्हेगारांची लपायची ठिकाणे आहेत हे उघड गुपित आहे
पाच कोटींची माहिती द्यायलाच हवी होती का???
दरम्यान मुंबई पोलिसांनी एका वाहतूक हवालदाराला आलेला मेसेज व्हायरल करून पोलीस खाते हा तपास किती गांभीर्याने घेत आहे तेच सिद्ध करत आहे की काय असे वाटू लागले आहे. वास्तविक ही माहिती माहिती म्हणून ठीक असेलही. पण सायबर विभागाकडे याची तक्रार करण्याआधी ती माध्यमाकंडे जाते हे गंभीर आहे. या धमकीची कसून चौकशी करून संबंधिताना कडक सजा होणे गरजेचे आहे. पुन्हा तिचं काळी गाडी दरम्यान काही महिन्यांपूर्वी इ डी ची एक नोटीस बाबा सिद्दीकी यांना आली होती. त्या नोटीसीचे पुढे काय झाले हे आता इडी लाच माहित नसावे असे वाटते. योगायोगाची गोष्ट म्हणजे अशीच एक काळी गाडी शिवसेनेचे यशवंत जाधव यांच्या शिंदे गटाकडें जाण्याआधी आली होती असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आणि या काळ्या गाडीच्या आगमन आणि निर्गमन झाल्या नंतरच बाबा अजित पवार गटाकडे गेल्याचे सूत्रांनी सांगितले. अन्यथा बाबा यांनी बांद्रा पश्चिम मतदार संघातून निवडणूक लढवण्याचे ठरले होते. जाताजाता गेल्या चार वर्षात बाबा अनेकदा लंडनला गेल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
विजयकुमार काळे
(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार - राजकिय विश्लेषक आहेत.)
留言