बिहारमध्ये विषारी दारू पिऊन चाळीस पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. विषारी दारू पिऊन मृत्युकांड घडल्याची ही देशातील पहिली वेळ नाही तर अशा अनेक घटना याआधी देशात घडल्या आहे. दरवर्षी अशी एखादी तरी घटना घडतेच. सहा महिन्यापूर्वीच तामिनाडूमध्ये अशी दुर्दैवी घटना घडली होती. मागील पूर्वी पंजाबमध्ये विषारी दारू पिऊन ९० लोकांचा बळी गेला होता. बिहार राज्यातील तर अशा अनेक घटना घडल्या आहेत. दोन वर्षापूर्वी बिहारमध्येच विषारी दारू पिऊन ३६ जणांना जीव गमवावा लागला होता. बिहार हे राज्य तर विषारी दारू साठीच प्रसिद्ध आहे की काय अशी शंका आता येऊ लागली आहे कारण विषारी दारूचे सर्वाधिक बळी हे बिहार राज्यातच गेले आहेत. ऑक्टोबर २०२२ मध्ये बिहार मध्येच विषारी दारू पिल्याने ७२ जण दगावले होते.
मार्च २०२२ मध्ये १२ जण तर नोव्हेंबर २०२१ मध्ये ४२ जणांचा बळी गेला होता. आताही तिथेच पुन्हा ही दुर्दैवी घटना घडली आहे. मागील घेटनेतून कोणताही बोध न घेतल्यानेच अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होत आहे. विशेष म्हणजे बिहार राज्यात संपूर्ण दारू बंदी आहे. विषारी दारुकांडात ४० हून अधिक लोकांचा बळी गेल्यावर नेहमीप्रमाणे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यासाठी एस आय टी नेमून संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची घोषणा त्यांनी केली पण यातून विशेष काही हाती लागेल असे वाटत नाही. एखादी दुर्दैवी घटना घडली आणि त्यात काही नागरिकांचा बळी गेला की त्या घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशी आयोग नेमणे ही आपल्या देशात नित्याची बाब आहे. पण त्या चौकशी आयोगाचे पुढे काय होते? त्यातून दोषींना शिक्षा होते का ? शिक्षा झाली तर मग अशा घटनांची पुनरावृत्ती का होते? हे प्रश्न अनुत्तरितच राहतात. मुळात अशा घटना घडूच नयेत यासाठी सरकार काय प्रयत्न करते हे महत्वाचे आहे. विषारी दारू उत्पादित करून ती विकली जात असताना बिहार सरकार आणि तेथील पोलीस यंत्रणा काय करत होती हा खरा प्रश्न आहे. दारूची निर्मिती करणारे दारुमध्ये अल्कोहोल, धतुरा आणि युरिया टाकत होते अशी माहिती समोर आली आहे. ही दारू बनवण्यासाठी नवसागर आणि मिथाईल अल्कोहोल यासारख्या रसायनांचा देखील वापर केला जातो. हे सर्व पदार्थ मानवी शरीरासाठी हानिकारक आहेत. हे माहीत असतानाही त्याचा दारुसाठी सर्रास वापर केला जातो. आपल्या देशात विना परवाना दारू विक्री करणे हा गुन्हा असताना गाव खेड्यातच नव्हे तर शहरातही अवैध दारूच्या भट्ट्या जागोजागी दिसतात. या भट्ट्यांमध्ये अवैध पद्धतीने दारू उत्पादित केली जाते. हे पोलिसांसह प्रशासनाला देखील माहीत असते पण या दारू माफियांनी पोलिसांसह प्रशासनाचे देखील हात आधीच ओले केले असल्याने ते त्याकडे काणाडोळा करतात त्याचा परिणाम म्हणून अशा दुर्दैवी घटना घडतात. एखादी घटना घडली किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौरा असला तरच कारवाईचे नाटक केले जाते आणि काही दिवसांनी पुनश्च हरिओम होतो. दारू माफिया व पोलीस प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी यांच्या अभद्र युतीमुळेच अशा दुर्दैवी घटना घडतात. जोवर ही भ्रष्ट युती तुटत नाही आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होत नाही तोवर या घटना थांबतील असे वाटत नाही. या घटनेची देशभर चर्चा झाल्याने बिहार पोलिसांवरील दबाव वाढला त्यामुळे त्यांनी काही लोकांना अटक केली मात्र ही अटक केवळ दिखाव्यापुरती आहे. छोट्या माशांना अटक करून बिहार पोलीस कारवाईचा दिखावा करत आहेत. मोठे मासे म्हणजे दारू माफियांना गजाआड करण्याचे धाडस बिहार पोलीस दाखवू शकत नाही. अर्थात दारू पिणारे लोक त्यांच्याकडे येतात म्हणूनच ते दारू विकतात हे ही तितकेच खरे आहे. दारूच्या आहारी गेलेले लोक दारू मिळाली नाही तर जी दारू मिळेल ती पितात. आपण जी दारू पितो तिच्यामुळे आपला जीवही जाऊ शकतो याचेही त्यांना भान नसते. दारू माफियांवर कारवाई करण्यासोबतच दारूच्या आहारी गेलेल्या लोकांचे समुपदेशन करून त्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी देखील शासन स्तरावरून प्रयत्न व्हायला हवेत.
श्याम ठाणेदार,
पुणे
Comments