भारतीय उद्योग क्षेत्राला जगात टॉपवर नेण्यात आपले जीवन अर्पण करणारे उद्योजक म्हणून त्यांच्या नावाची कीर्ती त्रिखंडात गाजतेय.असे देशाचे उद्योग महानायक रतन टाटा यांचे बुधवारी रात्री महानिर्वाण झाले आणि देशाचे उद्योगक्षेत्र दुःखात बुडाले. टाटांनी ज्या ज्या क्षेत्रात पाऊल टाकले ते क्षेत्र बटू वामनाप्रमाणे पादाक्रांत केले.
भारताला जगात पाचवी मोठी आर्थिक महासत्ता बनवण्यात टाटा यांचा सिंहाचा वाटा आहे. लाखो कोटी रुपयांचे साम्राज्य उभे करून एखाद्या तपस्वी योग्याप्रमाणे जीवन जगणारे रतन टाटा हे देशातील युवा उद्योजकांसाठी नेहमीच प्रेरणास्थान ठरले. मोठ्या परिश्रमाने टाटा उद्योगसमूहाला कुबेराच्या साम्राज्याचे रूप देणारे रतन टाटा यांनी कधीही आपल्या कर्तृत्वाचा गर्व अथवा मिथ्या अभिमान बाळगला नाही. त्यातच प्रखर राष्ट्रवादी उद्योजक, कनवाळू आणि गोरगरिबांच्या हालअपेष्ठाची जाण ठेवणारा मोठा उद्योजक अशी प्रतिमा टाटा यांनी जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत जपली.त्यांच्या जाण्याने देशातील प्रत्येक घरातील सदस्य हळहळला .असे भाग्य मोजक्याच महान व्यक्तीच्या नशिबी येते हे मात्र खरे.त्यांच्या निधनाने भारतीय उद्योग क्षेत्राची न भरून येणारी हानी झालीय.
अगदी थेट स्वयंपाक घरातील मिठापासून थेट आलिशान कारच्या निर्मितीपर्यंतची सर्व उत्पादने टाटांनी बनवली.सामान्य नागरिकांच्या समस्यांची जाण ठेवत आपल्या उद्योगांची उभारणी करणारे रतन टाटा हे देशाच्या उद्योग क्षेत्राचे 'आधुनिक दधिची' होते असते म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.कारण कधी काळी मंदी आणि उतरती कळा लागलेल्या भारतीय उद्योग क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचे काम टाटा यांनी आपले अफलातून कर्तृत्व आणि जिद्दीने केले. जमशेटजी टाटा यांनी टाटा उद्योगसमूहाचा भक्कम पाया रचला आणि रतन टाटा यांनी त्या साम्राज्यावर सोन्याचा कळस चढवला.कोणताही प्रकल्प हाती घेताना तो यशस्वी करणारच हि जिद्द उद्योग क्षेत्राच्या या 'अनमोल रतन' कडे होती. त्यामुळेच खाद्य उत्पादन क्षेत्र असो कि मोटार वाहन उद्योग असो टाटा हा देश-विदेशात विश्वासाचा ब्रँड बनला.आपल्या ऋषितुल्य वागणुकीने रतन टाटा हे भारतीय उद्योग क्षेत्राचे महर्षी बनले.देशात सरकार कोणाचेही असो राष्ट्रनिर्माण आणि प्रखर देशभक्तीच्या भावनेने टाटा यांनी काम केले. ते करताना गोरगरीब कामगार आणि आपल्या सहकाऱ्यांना रतन टाटा यांनी अगदी आपल्या परिवाराप्रमाणे जपले. म्हणूनच आज टाटा यांना निरोप देतांना त्यांचे देशभरातील लाखो कामगार आणि चाहते अश्रू ढाळताना दिसले. टाटांना 'भारतरत्न' द्या अशी मोहीम गेली अनेक वर्षे सुरु होती. पण खुद्द रतन टाटा यांनी देशवासीयांची अपार प्रेम हाच माझ्यासाठी 'भारतरत्न' किताब आहे असे सांगून आपल्या मनाचा मोठेपणा सतत दाखवला. माझा देशवासीय आरोग्यसंपन्न आणि सुरक्षित राहिला पाहिजे, हा उद्देश डोळ्यापुढे ठेऊन त्यांनी टाटा ट्रस्टच्या नावाने अनेक समाजोपयोगी ट्रस्ट सुरु केले. त्यातून गोरगरिबांना वैद्यकीय , शैक्षणिक आणि सामाजिक मदतीचा ओघ सतत सुरु राहिला आहे.
आपण 'व्यापारी नसून उद्योजक' आहोत हे सांगणारे रतन टाटा हे देशातील सच्चे समाजसेवक आणि मानवतावादी नेते होते. पैसा आणि संपत्ती जमा करणे हे आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट नसून देशवासीयांच्या सेवेसाठी उद्योग उभारायचे हा संकल्प टाटा यांनी अखेरच्या श्वासापर्यंत पाळला. रतन टाटा यांना जवळून पाहायचा योग्य अनेकदा मला आलाय. लाखो कोटींचा मालक असलेले टाटा यांचे पाय सतत जमिनीवर असायचे.अगदी एखाद्या कार्यक्रमात सामान्य कामगार अथवा नागरिकांत मिसळून ते त्या कार्यक्रम आणि उपक्रमात सहभागी व्हायचे. बाबुलनाथ येथील रतन टाटा इन्स्टिट्यूटचे कामगार पगारवाढीसाठी टाटांच्या विरोधात घोषणाबाजी करीत रस्त्यावर उतरले होते. रतन टाटा स्वतः तिथे आले आणि रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलक कामगारांशी यशस्वी चर्चा करीत त्यांचे समाधान केले हा प्रसंग मी स्वतः काही वर्षांपूर्वी डोळ्याने पाहिलाय. त्यामुळे दयाळू आणि कष्टकऱ्यांची जाण असणारा उद्योगपती हि टाटा यांना दिली जाणारी उपाधी अगदी सार्थक असल्याचे मला ठाऊक आहे. १९३७ मध्ये एका सामान्य पारसी कुटुंबात जन्मलेले रतन टाटा हे जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर केवळ भारतीयांच्या नव्हे तर जगभरातील नागरिकांच्या गळ्यातले ताईत बनले. टाटा उद्योगसमूहाचे नेतृत्व आल्यावर १९८१ सालापासून रतन टाटा यांचे कर्तृत्व अधिकच उजळले. आपल्या अफलातून नेतृत्व गुणांच्या बळावर त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा विस्तार जागतिक पातळीवरही वाढवला. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याचे स्वप्न साकारण्यात उद्योजक म्हणून रतन टाटा यांचे योगदान बहुमूल्य आहे. त्यांचे प्राणीप्रेमी हा तर देशभरात चर्चिला जाणारा विषय आहे. मुंबईतील भटक्या श्वानांची कुत्तरओढ पाहून त्यांचे मन दुःखी झाले यातूनच त्यांनी मुंबईत भटक्या प्राण्यांसाठी पशुवैद्यकीय रुग्णालय आणि भटक्या श्वानांसाठी आश्रय देणारा निवारा उभारला.स्वतःचा पाळीव श्वान आजारी असताना त्यांना ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स चार्ल्स यांनी जाहीर केलेला पुरस्कार त्यांनी नाकारला. माझा लाडका डॉगी आजारी आहे मी तुमचे आमंत्रण स्वीकारू शकता नाही असा निरोप त्यांनी राजपुत्र चार्ल्स यांना पाठवला. हा किस्सा त्यांचे सहकारी उद्योजक सुहेल सेठ यांनी टाटा यांना आदरांजली वाहताना सांगितला.टाटा उद्योगसमूहाच्या कामगारांसाठी तर रतन टाटा हे साक्षात परमेश्वरच ठरल्याची भावना हि त्यांच्या दातृत्वगुणांना आणि साधेपणाला मिळालेली मोठी पोचपावती होय. जगातील अनेक देशांनी रतन टाटा यांना नेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. कारण या देशाच्या प्रगतीत तेथील टाटांच्या उद्योगांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. एका गरीब कुटुंबाला भर पावसात टॅक्सी मिळाली नाही आणि ते भिजत निघाली हे पाहून दयाळू रतन टाटांचे मन दुःखी झाले. त्यातूनच त्यांनी गरीब, सामान्य नागरिकांनाही परवडेल अशी नॅनो कार तयार करायचे ठरवले आणि देशभरात नॅनो कारचे उत्पादनही केले. भारतीय क्रीडा क्षेत्रालाही रतन टाटा यांच्या योगदानाचा मोठा लाभ झाला आहे. देशाला अनेक प्रतिभावंत क्रिकेटपटू , हॉकीपटू , फुटबालपटू आणि कबड्डीपटू टाटा उद्योगसमूहाने दिले आहेत. दिलीप वेंगसरकर ,रवी शास्त्री ,युवराज सिंह , हरभजन सिंग ,मिलिंद रेगे,जवागल श्रीनाथ,इरफान पठाण, अजित आगरकर ,संदीप पाटील, किरण मोरे ,फारूख इंजिनिअर,सौरभ गांगुली ,शार्दूल ठाकूर हे क्रिकेट जगत गाजवणारे स्टार क्रिकेटर टाटा समूहातून खेळून मोठे झाले आहेत.सामान्य घरापासून थेट क्रीडा क्षेत्राशी आपले अतूट नाते ठेवणारा उद्योगपती म्हणून रतन टाटा हे नाव आज केवळ भारतवर्षातच नव्हे तर जगभरात गाजतेय.एक दयाळू ,कनवाळू उद्योजक,दूरदर्शी नेता आणि प्रखर राष्ट्रप्रेमी उद्योगपती आज आपल्यात नाहीय हि जाणीवच देशवासियांना अस्वस्थ करून सोडणारी आहे. भारतमातेच्या या थोर सुपुत्राला 'शत शत' नमन.
- नवनाथ दांडेकर
תגובות