चमत्कारावर अनेकांचा विश्वास नसला तरी हरियाणातील निकाल पाहता त्यावर विश्वास नसणाऱ्यांचाही विश्वास बसेल अशीच परिस्थिती समोर आली आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीने निकाल लागला त्या पद्धतीवर आता चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. एका तासात येथील निकालाचाच निकाल लागला असे म्हटले तर ते वाघे ठरणार नाही. कारण ज्या पद्धतीने काँग्रेस पहिल्या सत्रात सर्वच ठिकाणी आघाडीवर चालली होती ती आघाडी काही मिनिटात सर्वच ठिकाणी तुटेल असे कोणालाही वाटले नव्हते. न वाटण्याला कारण हे तसेच असावे. कारण हा काही जादूगराचा चमत्कार नाही तर प्रत्यक्षात एका तासात बाजी पलटल्याचा चमत्कार होता. ही बाजी ज्या पद्धतीने पलटली तिच्याबद्दलच अनेकांच्या मनात संशय आहे. म्हणूनच या प्रकाराला पचवायचे असेल तर चमत्कार घडला असेच म्हणाचे लागेल. जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालात काँग्रेसला अच्छे दिन येतील असे भाकित सर्वच एक्झिट पोलनी वर्तवले होते, ते भाकित निम्मेच खरे ठरले. नॅशनल कॉन्फरन्सच्या मदतीने जम्मू- काश्मीरमध्ये काँग्रेस सत्तेत परत आली असली, तरी काँग्रेसला हरियाणात मात्र अत्यंत धक्कादायक परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. सगळ्याच एक्झिट पोलनी हरियाणात काँग्रेसचा एकतर्फी विजय होईल, असे भाकित केले होते. अगदी मतमोजणीच्या दिवशी सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर 11 वाजेपर्यंत पोस्टल बॅलेट आणि पहिली फेरी होईपर्यंत काँग्रेस 50 ते 55 च्या स्थितीत होती, पण दुपारी बारानंतर परिस्थिती नेमकी उलटी झाली आणि काँग्रेस पराभूत झाली. हरियाणात आश्चर्यकारकरित्या गेल्या वेळेपेक्षाही अधिक जागा घेऊन भारतीय जनता पक्षाने त्या राज्यात तिसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे. या धक्कादायक निकालाने अनेक राजकीय विश्लेषकही चकीत झाले आहेत. सायंकाळी चार वाजेपर्यंत भारतीय जनता पक्षाला तेथे एकतर्फी यश मिळाल्याचे दाखवले गेले असले, तरी प्रत्यक्ष निकाल जाहीर होईपर्यंत स्थिती स्पष्ट होऊ शकत नाही, असे अनेकांचे म्हणणे पडले. पूर्ण निकाल जाहीर व्हायच्या आधीच पंतप्रधानांनी हरियाणाच्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांचे फोनवर अभिनंदन करून जवळपास विजयावर शिक्कामोर्तब करून टाकले असले, तरी काँग्रेसच्या गोटातून मात्र वेगळीच शक्यता वर्तवली जात होती. एक तर त्यांचा या निकालावर अजिबात विश्वास नव्हता. मुळात मधल्या दोन-तीन तासांत निवडणूक आयोगाची आकडेवारी अत्यंत धीम्या गतीने जाहीर होत होती. सगळ्या वाहिन्यांचे प्रतिनिधी विविध मतमोजणी केंद्रावर उभे राहून जे इनपुट देत होते, त्यातही काँग्रेसच आघाडीवर असल्याचे दिसत होते. त्यानंतर मात्र सगळ्या वाहिन्यांनी आपल्या रिपोर्टर्सना किंवा त्यांनी दिलेल्या माहितीला स्थान न देता निवडणूक आयोगाच्या आकडेवारी वरच लक्ष केंद्रित केले आणि तिथे भाजप विजयी होत असल्याचे सातत्याने दाखवले गेले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रत्यक्ष निकालाची स्थिती स्पष्ट झालेली नव्हती. साडेचारच्या सुमाराला एका वाहिनीने हरियाणातील 22 जागांचे प्रत्यक्ष निकाल जाहीर केले त्यात काँग्रेस 13 जागांवर विजयी झाल्याचे नमूद करण्यात आले होते; पण त्यानंतर मात्र त्या वाहिनीन पुढचे अधिकृत निकाल जाहीर करणे थांबवले. हा सगळा प्रकार संशयाला आणि चर्चेला कारणीभूत ठरला. चंदिगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा उमेदवार स्पष्ट बहुमत मिळवून विजयी झालेला असताना तिथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने स्वतःच्या हाताने मतपत्रिकांवर फुल्या मारून भाजपच्या उमेदवाराला विजयी घोषित केल्याचे प्रकरण अनेकांनी निदर्शनाला आणून देत हरियाणाच्या निकालावर शेवटपर्यंत शंका व्यक्त केली. अर्थात, असे असले तरी भारतीय जनता पक्षाला तिथे मिळालेला विजय हा त्यांच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. भारतीय जनता पक्ष हरियाणात 100 टक्के पराभूत होणार हे सगळेच राजकीय निरीक्षक गृहीत धरून चालले होते. एवढेच नव्हे तर खुद्द भाजपच्या गोटात निवडणुकीच्या आधी मोठ्या प्रमाणात पळापळ सुरू झाली आणि त्यांचे तब्बल 72 नेते भाजप सोडून काँग्रेस व अन्यत्र गेले, हे सगळे चित्र एकीकडे आणि निवडणुकीचा प्रत्यक्ष निकाल एकीकडे हा विस्मयकारक मामला येथील निकालाच्या दिवशी लोकांच्या पुढे आला. हरियाणातील एकही घटक भाजपला अनुकूल नव्हता, असे चित्र स्पष्ट दिसत असूनही भाजपने तिथे जी बाजी मारली त्याला तोड नाही. हा विजय भाजपने नेमक्या कोणत्या रणनीतीच्या आधारे साकारला याविषयीच्या बाकीच्या बाबी यथावकाश आपल्यापुढे येतीलच; पण या एकूणच निकाल प्रक्रियेच्या विरोधात काँग्रेसने आवाज उठवण्याची तयारी सुरू केली आहे. 'ये लोकतंत्र की नही बल्की भाजपा के इलेक्शन तंत्र की जीत है' अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या गोटातून देण्यात आली दुसरीकडे, जम्मू-कश्मीरच्या निवडणुकीत मात्र भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळू शकलेले नाही, हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे. कलम 370 रद्द झाल्यानंतर जम्मू- काश्मीर वेगाने विकसित होत असल्याचा दावा भाजपकडून केला जात होता, त्यातून भाजप व मित्र पक्षाला अत्यंत अनुकूल वातावरण असल्याचे भाजपकडून वारंवार सांगितले जात होते. पण तिथले निकाल मात्र भारतीय जनता पक्षाला निराश करणारे ठरले आहेत. जम्मू-काश्मीर या राज्याची भौगोलिक विभागणी काश्मीर खोरे आणि जम्मू अशी आहे. त्यात काश्मीर खोऱ्यात मुस्लीम बहुसंख्य आहेत. तिथे विधानसभेच्या 47 जागा आहेत. त्यापैकी एकही जागा भारतीय जनता पक्षाला जिंकता आली नाही. जम्मू विभाग हा हिंदूबहुल विभाग मानला जातो, तिथे भारतीय जनता पक्ष 370 कलमाविषयीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर खूप मोठी मजल मारेल असे अपेक्षित होते; जम्मू विभागातील 43 जागांपैकी 29 जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. पण काश्मीर खोऱ्यात एकही जागा जिंकता न आल्याने हा पक्ष सत्तेपासून दूर राहिला. कलम 370 रद्द करून आपण फार मोठी बाजी मारली असल्याचा जो दावा भाजपकडून केला जात होता तो दावा त्या राज्यातल्या जनतेनेच अमान्य केला आहे, असा संदेश यातून गेला आहे. या दोन्ही राज्यांच्या निकालावर काँग्रेस पक्षाचे भवितव्य आणि पुढील वाटचाल अवलंबून होती त्यांना तिथे संमिश्र यश मिळाले आहे. जम्मू-काश्मिरात नॅशनल कॉन्फरन्सच्या मदतीने काँग्रेसला सत्ता मिळाली असली तरी, त्या यशात नॅशनल कॉन्फरन्सचा सिंहाचा वाटा आहे, हे विसरून चालणार नाही. या संमिश्र निकालने भाजपला बऱ्यापैकी तारले आहे, असा निष्कर्ष आपण आज तरी काढू शकतो. पण हा निष्कर्ष काढता नाही अनेकांच्या मनात सल आहे. हरियाणा मध्ये ज्या पद्धतीचे चित्र निर्माण झाले होते त्या चित्राने भाजप देखील हादरलेला होता. येथील शेतकरी आंदोलनाने आधीच अँटी भाजप वातावरण निर्माण केले होते. त्यातच फोगाट पहिलवान प्रकरणांनी येथील जनता अँटी भाजप झाली आहे असे अनेकांना वाटत होते. मीडियामध्येही तसेच लाईन दिसत होती. अनेकांचा सर्वेही हेच लाईन सांगत होता. म्हणूनच हरियाणा एकतर्फे निकाल देतो आणि तोही काँग्रेसच्या बाजूने असं विरोधकांनी गृहीत धरल्याचे वाटत होते. परंतु ज्या पद्धतीने हा निकाल लागला त्याने या सगळ्यांच्या शंका कुशकांना पूर्णविराम दिला. अर्थात याला पूर्णविराम म्हणता येणार नाही परंतु काँग्रेस सरकार स्थापन करणार असे सुरुवातीचा निकाल सांगत असताना तासाभराच्या काउंटिंग नंतर मात्र हा निकाल भाजपच्या पारड्यात गेल्याने त्यावर अनेकांना शंका आली. आता या शंकेबाबत पुढील काही दिवस अनेक चर्चासत्रे घडतील. सामान्य जनता हे काही दिवस घडत असलेले चर्चा ऐकून नंतर त्याकडे दुर्लक्ष करेल. हे सगळे घडले गेले तरी येथे भाजप विजयी झाला तो विजय देखील टाळता येणार नाही. त्यामुळे कोणी काही म्हणा भाजपने या राज्यात काँग्रेसचा निकाल लावला हे मात्र नक्की.
~ संपादकीय
Комментарии