कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या बिग बॉस या रिॲलिटी शो चा ग्रँड फिनाले रविवारी रंगला आणि या अपेक्षेप्रमाणे सूरज चव्हाण हा या रिॲलिटी शो चा विजेता ठरला. सूरज चव्हाण या शो चा विजेता ठरावा अशी प्रेक्षकांची ईच्छा होती कारण अल्पावधीतच त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. त्याचा भोळसट स्वभाव आणि निरागस वागणूक यामुळे प्रेक्षक त्याच्या प्रेमात पडले होते. मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार या शो मध्ये त्याचे प्रतिस्पर्धी होते त्यामुळे त्याला कोणीच जमेस धरले नव्हते. टीकटॉक वर स्वतःचे काही सेकंदाचे व्हिडिओ बनवून टाकणारा सूरज चव्हाण हा या शो चा विजेता ठरेल असे सूरज वगळता कोणालाच वाटले नव्हते. सूरजला मात्र स्वतः वर विश्वास होता आणि याच विश्वासाच्या जोरावर तो विजेता ठरला. काहीही करून हा शो जिंकायचाच असा विचार करून तो शो मध्ये उतरला आणि त्याने स्वतः ला सिद्ध केले.
सूरज बिग बॉस चा विजेता ठरला असला तरी त्याचा इतपर्यंत चा प्रवास सोपा नव्हता. बारामती येथे जन्मलेल्या सूरज चव्हाणचे बालपण अतिशय खडतर अवस्थेत गेले. सूरज चव्हाण लहान असतानाच त्याचे आई वडील वारले. लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरपलेल्या सूरज चव्हाणचा सांभाळ त्याच्या मोठ्या बहिणीने केला. त्याला एकूण पाच बहिणी आहेत. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने आठवितच सूरजला शाळा सोडून द्यावी लागली. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने एक वेळचे जेवण मिळणे देखील मुश्कील त्यामुळे कित्येकदा तो उपाशी किंवा अर्धपोटीच झोपत असे. पोटाची खळगी भरण्यासाठी त्याने मंदिरातील नैवद्य खाऊन दिवस काढले. किशोर वयातच त्याला सोशल मिडियाचे वेड लागले. इतर मुलांसारखे तो ही टिक टॉक या सोशल मीडिया साईट वर स्वतःचे व्हिडिओ काढून टाकू लागला. अल्पावधीतच त्याचे व्हिडिओ लोकप्रिय झाले आणि बघता बघता तो महाराष्ट्रात फेमस झाला तो त्याच्या आगळ्या वेगळ्या शैलीने, त्याचे डायलॉग अक्षरशः वाऱ्या सारखे व्हायरल झाले. गुलिगत धोका, बुक्कित टेंगुळ, झापुक झुपुक, मरीआई पावली या सारखे त्याचे कितीतरी डायलॉग हिट झाले आणि तो टिक टॉक स्टार झाला. टिक टॉक यू ट्यूब कडून त्याला पैसेही मिळाले पण सुरुवातीला त्याच्या भोळ्या स्वभावामुळे ते त्याच्या पर्यंत पोहचले नाही तरीही त्याची काही तक्रार नव्हती. तो त्याचे व्हिडिओ, रिल्स बनवून प्रेक्षकांसमोर येतच होता. त्याची लोकप्रियता वाढतच होती. त्याच्या याच लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी कलर्स मराठी वाहिनीने त्याला बिग बॉस शो ची ऑफर दिली.
सुरुवातीला सूरज बिग बॉसच्या घरात यायला तयार नव्हता. पण कलर्स वाहिनीने त्यांचा हट्ट सोडला नाही अखेर सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात यायला तयार झाला आणि आज सूरजने थेट बिग बॉसच्या ट्रॉफी वर नाव कोरत इतिहास घडवला. काही जण त्याच्या या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून म्हणतात की बिग बॉस प्रि प्लॅेड होतं पण तळागाळातील सर्वसामान्य मुलासासाठी कोण प्लॅन करणार ? कोण त्याचा एवढा विचार करणार ? ते पण एवढ्या मोठ्या कसलेल्या कलाकारांसमोर. सूरज चव्हाण त्याच्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या बळावर ईथवर पोहचला आहे. आता त्याच्या कष्टाचे चीज झाले असे म्हणावे लागेल. बिग बॉस विजेत्या सूरज चव्हाणचे मनापासून अभिनंदन !!
श्याम ठाणेदार,
पुणे
Comments