top of page

देवीच्या मारक रूपाची उपासना; काळाची आवश्यकता!



नवरात्र हा खरेतर मांगल्याचा आणि पावित्र्याचा उत्सव. स्त्रीशक्तीचा जागर करण्याचा उत्सव, देवीच्या पराक्रमाची उपासना करण्याचा उत्सव. महिषासुराशी नऊ दिवस युद्ध करून नवव्या रात्री देवीने महिषासुराचा वध केला. या युद्धाचे प्रतीक म्हणून टिपऱ्या म्हणजेच दांडिया खेळल्या जातात. आजमितीला मात्र या उत्सवाला आलेले ग्लॅमरस स्वरूप उत्सवाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. चांगले नृत्य करता यावे म्हणून तरुणींसह तरुणही एक महिना अगोदरपासून नृत्याचे क्लासेस घेऊ लागले आहेत.

पाठ उघडी ठेऊन त्यावर रंगरंगोटी करण्याचे किळसवाणे फॅड गेल्या काही वर्षांपासून तरुणींमध्ये शिरले आहे. नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे परिधान करणे, कपड्यांसह त्यांना मॅचिंग आभूषने परिधान करणे, साजेसा मेकअप करणे, गरबा नृत्य करताना अथवा दांडिया खेळताना इतरांपेक्षा वेगळे दिसण्याचा प्रयत्न करणे याकडेच महिलांचा अधिक कल दिसून येतो. एका राक्षसी प्रवृत्तीवर प्रकट स्त्रीशक्तीने युद्ध करून मिळवलेला विजय म्हणजे नवरात्रीचा उत्सव. या नऊ दिवसांत देवीने युद्ध करून क्षात्रतेजाच्या उपासनेचे महत्व पटवून दिले. स्त्री ही अबला नसून प्रसंगी अन्याय अत्याचाराचा कर्दनकाळ ठरू शकते हे देवीने स्वतः युद्ध करून दाखवून दिले. आज आपण नवरात्रीच्या काळात दांडिया किंवा टिपऱ्या खेळतो, हा खेळ नसून ते युद्धाचे प्रतीकात्मक स्वरूप आहे हेही आज अनेकांना माहित नाही.

आजमितीला स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना कमालीच्या वाढल्या आहेत. ३ वर्षाच्या बालिकेपासून वयोवृद्धाही आज सुरक्षित नाहीत. बदलापूर पाठोपाठ पुण्यातील घटनेने साऱ्या राज्याला हादरवून सोडले. दुसरीकडे लव्ह जिहादरूपी राक्षस हिंदू स्त्रियांना विविध आमिषे आणि प्रलोभने दाखवून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून हिंदूंचा वंशविच्छेद करू लागला आहे. राजकीय मंडळींना स्त्रियांच्या सुरक्षेपेक्षा राज्यात आपली सत्ता आणणे अधिक महत्वाचे वाटत असल्याने स्त्री सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावले उचललीच जात नाहीत. अशा वेळी स्त्रियांनीच आपल्या सुरक्षेसाठी सज्ज झाले पाहिजे.

समाजाची ढासळलेली नीतिमत्ता पाहता प्रतिकूल प्रसंगांना सामोरे जाण्याची वेळ स्त्रियांवर कधीही येऊ शकते यासाठी प्रत्येक स्त्रीने आपले शरीर आणि मन प्रतिकारक्षम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता स्त्रियांनी स्वरक्षणाचे प्रशिक्षण घेणे आज अत्यंत गरजेचे बनले आहे. कराटे, लाठीकाठी यांसह आपल्या दैनंदिन वापरातील वस्तूंच्या आधारे स्वतःचे रक्षण कसे करावे, प्रवासात स्वरक्षणासाठी कोणती साधने स्वतःसोबत बाळगावीत यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि संघटना आज गावोगावी आहेत. त्यांचा लाभ करून स्वतःतील आत्मबल वाढवूया. जेव्हा कधी आपल्यावर प्रतिकूल प्रसंग येईल तेव्हा आपले नातेवाईक, मित्र मंडळी, पोलीस, राजकीय मंडळी आपले रक्षण करण्यास वेळेत पोहोचतील याची शाश्वती नाही अशा वेळी समोरच्याशी दोन हात करून त्याला धडा शिकवायचा असेल तर तेव्हढी शारीरिक आणि मानसिक क्षमता आपल्यामध्ये असणे आज आवश्यक आहे. आपल्यासोबत आपल्या परिसरातील, कार्यालयातील स्रियांना सबला बनवण्याचे दायित्व आज स्रियांनीच घेण्याची वेळ आली आहे.

स्त्रियांना कायद्याचेही संरक्षण असल्याने समाजातील वासनांध प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी स्रियांनीच पुढे यायला हवे. आजच्या स्त्रियांसमोर आदर्श हवा आहे तो रणरागिणी झाशीच्या राणीचा, राजमाता जिजाबाईंचा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा. राणी चेन्नमांचा. स्त्रीशक्तीचा या प्रकट रूपाची उपासना करण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे या नवरात्रीला नवरात्री उत्सवामागील भावार्थ समजून घेऊन दुर्गादेवीच्या मारक रूपाची उपासना करण्याचा संकल्प करा !


जगन घाणेकर, 

घाटकोपर

2 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page