सामान्यातील सर्व सामान्य माणसं उदारमतवादी असतात. ते नेहमीच दुसर्यावर दगड न भिरकवता सदैव फुले उधळवतात.असा हा आनंद यात्री 'कोकणसुपुत्र ' मुंबई दहिसरचा दिलदार माणूस विजय दाजी गावडे होय.त्यांनी आपल्या वयाच्या ऐंशी वर्षात पदार्पण केले आहे.सहस्रचंद्रदर्शन योग खूपच जवळ आलाय. कोकणच्या लाल मातीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात वर्दे गावच्या नागझर वाडीत भारतीय स्वातंत्र्यदिनापूर्वी एक वर्ष १५सप्टेंबर १९४६ ला जन्माला आले. विजय दाजी गावडे लहानाचे मोठे झाले ते आपल्या गावातच.प्राथमिक-माध्यमिक शिक्षण पूर्ण करून सन १९६५मध्ये मुंबई वरळी येथील कापडाच्या मिल मध्ये गिरणीकामगार बनले. वर्षभर मिलमध्ये नोकरी करताना त्यांनी सोबत राष्ट्रीयकार्यही केले.
त्यानंतर १९६६ पासून मुंबई पोलिसात मालाड पोलीस ठाण्यात इमानेइतबारे नोकरी त्यांनी केली. ते लहानपणापासून भक्तीगीत गुणगुणत. विजय गावडे मनापासून अध्यात्मिक संतसाहित्याचे उपासक भजनीबुवा झाले. त्यांच्या गोड गळ्यातून संतवाणी अमृततुल्य श्रोतृवर्गाच्या कानोकानी गेली. त्यांचा शुभविवाह १९७१ला झाला .तीन सुपुत्र आणि एक सुकन्या असे त्यांचे कुटुंबीय आनंदात संसारात रमले आहे.ते पोलीस खात्यातील दीर्घकालीन सेवेनंतर १९९७मध्ये अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातून सेवानिवृत्ती VRS घेऊन 'भजनीसम्राट' ,'मृदूंगमणी' म्हणून दहिसर विभागात लोकप्रिय झाले.त्यांचे गुरूवर्य 'मृदुंगमणी' भजनीबुवा लक्ष्मण गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.दहिसर पूर्व शक्तीनगर विरंगुळा जेष्ठ नागरिक संघात दर गुरुवार आजही त्यांची संध्याकाळी दिवेलागण समयी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत जेष्ठ भजनीसम्राट कृष्णा सातोसे बुवा, पंढरीनाथ बिडीये वसंतराव ढोबळे,कृष्णा गावडे, भक्तीगीतांची सुरेल मैफल रंगत असते. विजय दाजी गावडे बुवा हार्मोनियम वर मृदुंग वाजवितात. गातात सुध्दा. विजय गावडे प्रेमळ, सरळमार्गी स्वभावाचे स्पष्ट वक्ते आहेत .त्यांच्या मार्गदर्शनाखाली दहिसर पूर्वेकडील बृहन्मुंबई महानगर पालिकेचे निसर्गरम्य हिरव्यागार माता सरस्वती उद्यानात जेष्ठ नागरिक कट्ट्याची स्थापना झाली आहे. ते प्रभातफेरीत आलेल्या सर्व नागरिकांचे मनापासून प्रेमपूर्वक स्वागत करतात. तसेच संध्याकाळी पुन्हा त्याच उद्यानात त्यांची मैफल जमते.
आमच्या सारख्या देशावरच्या 'घाटी' बांधवाना आपुलकीने 'येवा कोकण आपलोच असा' असे ते नेहमी प्रेमाने म्हणतात. विजय गावडे कोकणातून मुंबईत आल्यानंतर आम्हाला न विसरता कोकणचा मेवा,खाज्या, रेवड्या, आणि फळाच्या सिझनला कोकणचा आंबा खाऊ घालतात. नुकतीच त्यांच्या वाढदिवसानिमित्ताची पंगत दहिसरला बसली होती.या कोकणसुपुत्रांनी आपला खिसा ढिला ठेवून अस्सल मालवणी पदार्थ दिलदार मनाने आम्हाला खाऊ घातले.अशी दिलदार मनाची माणसे खूप दुर्मीळच..विजय गावडे मैत्र जीवाचा सख्खा.त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियाना निरोगी दीर्घायुष्य लाभो.ते यशवंत, किर्तीवंत होवोत. सदैव आनंदात राहोत ही दहिसर ग्रामदैवत आई गांवदेवी चरणी प्रार्थना.
दत्ताराम पुंजाजी घुगे
दहिसर
Comments