आज २४ ऑक्टोबर, आजचा दिवस संपूर्ण जगात जागतिक पोलिओ दिन म्हणून साजरा केला जातो. पोलिओ मुक्तीसाठी मोलाचे योगदान देणारे शास्त्रज्ञ जॉन सॉल्क यांचा आज जन्मदिवस. जॉन सॉल्क आणि त्यांच्या टीमने पोलिओची पहिली लस शोधून काढली म्हणून त्यांचाच जन्मदिन जागतिक पोलिओ दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेने घेतला. आजच्या दिवसाकडे पोलिओशी दिलेल्या यशस्वी लढ्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. जागतिक आरोग्य संघटनेने १९९८ सालापासून पल्स पोलिओची मोहीम हाती घेतली. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील रविवार पोलिओ रविवार म्हणून साजरा केला जातो. पोलिओ रविवारच्या नंतरच्या आठवड्यात ० ते ५ वयोगतील बालकांना घरोघरी जाऊन पोलिओचा डोस पाजला जातो. त्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती केली जाते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आपल्या आरोग्य यंत्रणेने भारतातून पोलिओ मुक्तीसाठी अथक प्रयत्न केले. अमिताभ बच्चन, मोहम्मद कैफ इत्यादी व्यक्तींनीही दूरचित्रवाणीवरून जनजागृती केली. शासन, प्रशासन, आरोग्य यंत्रणा यांच्या अथक प्रयत्नातून आज भारत पोलिओ मुक्त झाला आहे. २७ मार्च २०११ या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेने भारत पोलिओ मुक्त झाल्याची घोषणा केली. अर्थात सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाला पोलिओ मुक्त करणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नव्हती. सुरवातीला तर पालक आपल्या बालकांना पोलिओ डोस देण्यास तयारच होत नसे. आपल्या बालकांना पोलिओ डोस पाजण्यास पालक निरुत्साही होते. लोक घरातून बाहेरच पडत नसत. पालकांचा निरुत्साह असला तरी आरोग्य खात्यातील कर्मचारी हिरमुसले नाही. त्यांनी त्यांचे काम चालूच ठेवले. एखादे व्रत हाती घेतल्या प्रमाणे देशातील आरोग्य कर्मचारी पोलिओ मुक्तीसाठी झटत होते. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळाले.
१९९९ साली पोलिओच्या तीन विषाणूंपैकी दुसरा विषाणू नष्ट झाला मात्र पहिल्या आणि तिसऱ्या प्रकारचा विषाणू अजूनही कार्यरत होता. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार या राज्यात दूषित पाण्यामुळे जुलाब,उलट्यांचे प्रमाण अधिक असल्याने तिथे तोंडावाटे दिलेली लस उपयुक्त ठरत नव्हती. तेंव्हा वैद्यकीय संशोधकांनी मुरदाबाद या गावात पोलिओची एक गुणी लस म्हणजे १,२,३ विषाणूंची लस वेगवेगळी प्रत्येक जन्मलेल्या बाळास दिली. मात्र देशातील सगळ्या बालकांपर्यंत असा कार्यक्रम पोहचवणे अशक्य होते. त्यानंतर पुन्हा त्यात संशोधन करण्यात आले. सर्वांना उपयुक्त अशा लसीची मात्रा तयार झाल्यानंतर देशात पोलिओ मुक्तीची मोहीम वेगाने राबवण्यात आली. त्याचा परिणाम म्हणजे आज पोलिओमुक्त मुक्त भारत अशी आपली ओळख बनली आहे. भारत जरी पोलिओमुक्त झाला असला तरी जगातून पोलिओचे अजूनही समूळ उच्चाटन झाले नाही. आफ्रिका खंडातील काही देशात तसेच आशिया खंडातील पाकिस्तान, अफगाणिस्तान, सीरिया या देशात अजूनही पोलिओचे रुग्ण आढळून येतात. या देशातूनही पोलिओ लवकरच हद्दपार होईल आणि जग लवकरच पोलिओमुक्त होईल अशी आशा करूया.
- श्याम ठाणेदार
पुणे
Comments